महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमाची अंमलबजावणी
महाराष्ट्र शासनाच्या '१०० दिवस कृती आराखडा' अंतर्गत रोजगार हमी योजना प्रभागाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, मत्तानिर्मिती व शाश्वत विकासाच्या दिशेने उचललेली ठोस पावले ही या योजनेची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांचा कृती आराखड्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मध्ये राज्यात १,०१,१०० कामांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यामध्ये गायगोठा/शेळीपालन/कुक्कुटपालन शेड, घरकुल, तुती लागवड, नाडेप व व्हर्मी कंपोस्ट, फळबाग लागवड, मजगी, विहीर पुनर्भरण, शेततळे, शोषखड्डे, शौचालय, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते अश्याप्रकारची विविध स्वरुपाची १२ कामे समाविष्ट होती. ही कामे वैयक्तिक, सामूहिक आणि सार्वजनिक स्वरुपाची असून त्यांचा थेट लाभ ग्रामीण जनता, शेतकरी व मजुरांना झाला आहे. दिनांक ३० एप्रिल २०२५ अखेर राज्यात एकूण १,०८,८९० कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून सदर उद्दिष्ट १०८ टक्क्यांनी साध्य करण्यात आले आहे.
तसेच ग्रामीण भागात वैयक्तिक /सामुदायिक/सार्वजनिक कामांच्या माध्यमातून केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या (९.५ कोटी मनुष्यदिवस निर्मिती) दीडपट अकुशल मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत रोहयो प्रभागाने १६.२२ कोटी मनुष्यदिवस निर्मिती करुन सदर उद्दिष्ट १७० टक्क्यांनी साध्य करण्यात आले आहे. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी विभागाने युध्दपातळीवर प्रयत्न करुन शंभर टक्के गुण मिळवले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोजगार हमी योजना विभागाचे मा. मंत्री श्री. भरत गोगावले आणि सचिव (रोहयो) श्री. गणेश पाटील यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.
